आता मुलीच्या भविष्याची चिंता नको, इथे करा गुंतवणूक! मिळतील ७१ लाख रुपये

बहुतांश पालकांना आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसा कुठून आणायचा, याची सतत चिंता सतावत असते. विशेषत: मुलींबाबत ती जास्त असते. मात्र, सुकन्या समृद्धी योजना या योजनेत छोट्या-छोट्या रकमेची गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा निधी उभा करू शकता. मुलीच्या जन्मानंतर योग्यवेळी गुंतवणूक सुरू केली, तर मोठ्या खर्चांसाठी लाखो रुपयांचा निधी उभारता येतो. विशेष म्हणजे ७१ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.

 

योजनेत किती वर्षांपर्यंत करावी लागते गुंतवणूक?

या योजनेत १० वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते. खात्यात १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते, तर खात्याची मुदतपूर्ती २१ वर्षांनंतर होते. म्हणजेच गुंतवणूक थांबल्यानंतरही पुढील ६ वर्षे जमा रकमेवर व्याज मिळत राहते. या योजनेत एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करता येतात.

 

किती टक्के व्याज मिळते?

मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आजही देशातील सर्वाधिक लोकप्रिय सरकारी योजनांपैकी एक मानली जाते. सरकारच्या या लघुबचत योजनेत सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळत आहे. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी जोडले जाते. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीत छोटी बचतही मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते.

 

मुदतीपूर्वी रक्कम काढली तर… : जर एखादा पालक दरवर्षी ५०,००० रुपये जमा करत असेल आणि हे १५ वर्षे सुरू ठेवले, तर एकूण गुंतवणूक ७.५ लाख रुपये होईल. सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार, २१ वर्षांनंतर मुदतपूर्तीच्या वेळी ही रक्कम वाढून सुमारे २३.९४ लाख रुपये होऊ शकते.