अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये (THR) आता पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देण्यात आले आहे.
लाभार्थ्यांसाठी नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो. मात्र, लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आहाराचा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पाककृती कायम ठेवण्यात आली आहे. तसेच ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’ या दोन नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.
महिला शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; शेतकरी महिलांसाठी स्वतंत्र ‘तिजोरी’, वाचा काय आहे ‘महिला शेतकरी निधी’
आहारात झालेले मुख्य बदल
स्वतंत्र मसाल्याचे पाकीट – सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली आहे. आहाराचा दर्जा आणि चव अधिक उत्तम राखण्यासाठी आता मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे दिले जाईल.
नव्या पाककृतींचा समावेश – आहारात ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’ या दोन नवीन आणि स्वादिष्ट पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.
जुनी पाककृती कायम – लाभार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पाककृती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे.
या बदलांमुळे लाभार्थ्यांना आता अधिक पौष्टिक आणि रुचकर पाककृतींचा घरपोच आहार उपलब्ध होणार आहे. सर्व पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणात उष्मांक, प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांचा (मायक्रोन्यूट्रिएंट्स) समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सातत्याने विविध उपाययोजना राबवत असून मागील तीन वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची स्वीकृती वाढेल आणि कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास मंत्री अदिती तटकरेंनी व्यक्त केला. आहाराबाबत माहिती देताना डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, आहारामध्ये बदल करण्यापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि विविध विशेषज्ञ संस्थांची मते जाणून घेण्यात आली. क्षेत्रीय यंत्रणांशी झालेल्या चर्चेदरम्यान या नवीन पाककृतींना लाभार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल.