बुकिंग, रिफिलिंगपासून ते नव्या कनेक्शनपर्यंत! १ ऑगस्टपासून LPG चे अनेक नियम बदलणार!

जुलै महिना संपून आता ऑगस्ट सुरू होण्यासाठी काहीच तास उरले आहेत. दर महिन्याप्रमाणेच यंदाही एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर आणि पाईप नॅचरल गॅसशी (PNG) संबंधित अनेक महत्त्वाच्या नियमांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. बुकिंग, रिफिलिंग, नवीन कनेक्शन, सिलेंडर सरेंडर आणि दरातील बदल यांसह विविध विषयांवर सरकार आणि तेल कंपन्यांनी (OMCs) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुम्ही घरगुती एलपीजी किंवा पीएनजी वापरत असाल, तर हे नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

भारतगॅस लाईट झिप (Bharatgas Lite Zip) सेवा सुरू बीपीसीएलने (BPCL) नवीन ‘भारतगॅस लाईट झिप’ सेवा सुरू केली आहे. ही फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सेवा आहे. याद्वारे ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन अतिशय सोप्या प्रक्रियेत आणि वेगवान (एक्सप्रेस) गॅस डिलिव्हरी मिळेल. सध्या ही सेवा फक्त मुंबईत सुरू करण्यात आली आहे. मात्र, १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत २४ राज्यांतील १०० शहरांमध्ये ती लागू करण्याची योजना आहे.

 

स्विगी इन्स्टामार्टवरून (Swiggy Instamart) गॅस बुकिंग: एचपीसीएल (HPCL) आणि स्विगीने संयुक्तपणे ‘HP नव्य’ १० किलो एलपीजी सिलेंडर लाँच केला आहे. हा सिलेंडर लहान कुटुंबे, फ्लॅटमध्ये राहणारे नोकरदार, विद्यार्थी आणि दुय्यम (सेकंड) एलपीजी वापरकर्त्यांसाठी योग्य आहे. ‘HP नव्य’ (१० किलो) आणि ‘HP अप्पू गॅस’ (५ किलो) आता स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर करता येईल. सध्या ही सेवा फक्त बंगळुरूमध्ये उपलब्ध आहे. पहिल्यांदा खरेदी करताना डिलिव्हरीच्या वेळी ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. ऑनलाईन पेमेंटसह कॅश ऑन डिलिव्हरीचीही सुविधा आहे.

 

उज्वला योजनेअंतर्गत अनुदानित (Subsidized) रिफिलिंगमधील बदल: प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत (PMUY) अनुदानावर मिळणाऱ्या एलपीजी रिफिलची संख्या वर्षाला ९ वरून ४ वर आणली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात उज्वला ग्राहकांचा सरासरी वापर वर्षाला ४.७१ सिलेंडर इतका होता. या आधारे, खऱ्या गरजू ग्राहकांना मदत मिळावी आणि अनुदानाचा खर्च नियंत्रणात राहावा यासाठी वर्षाला ४ सबसिडीचे रिफिल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

घरगुती एलपीजी दर (14.2 kg): HPCL, BPCL आणि इंडियन ऑईल दर महिन्याच्या सुरुवातीला घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर निश्चित करतात. जुलै २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर यथास्थिती (स्थिर) ठेवण्यात आले आहेत. सध्याचे दर: दिल्ली – ₹९४२, कोलकाता – ₹९६८, मुंबई – ₹९४१.५०, चेन्नई – ₹९५७.५०, बंगळुरू – ₹९५०.००