महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी एक ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल ऑमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे.
१ ऑगस्टपूर्वी स्मार्ट कार्ड प्राप्त
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी जिल्हाभरात स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे, यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
स्मार्ट कार्डमुळे सवलतींचा लाभ
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी वेळेत स्मार्ट कार्डची नोंदणी करून ते प्राप्त करून घ्यावे. जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, स्मार्ट कार्डमुळे सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे, असे साताऱ्याचे विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी सांगितले.
मुदतीत कार्ड काढणे बंधनकारक
एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून तीन लाख पाच हजार ८६५ कार्ड वितरित केले आहे. उर्वरित सवलधारकांची नोंदणी सुरू असून, जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कार्ड वितरण करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत सर्वच सवलतधारकांनी मुदतीत कार्ड काढणे बंधनकारक असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.