रशिया ठरला भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार; अमेरिकन आयातीत मोठी घसरण

जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी वाढ केली आहे. रशियासोबतचभारताने संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) देखील तेल खरेदीचा वेग वाढवला आहे.

 

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पूर्ववत सुरू होण्यापूर्वी आणि आखाती देशांतून पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्याआधी, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी भारतीय रिफायनरीजनी जून महिन्यात ही आक्रमक खेदी सुरू केल्याचे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

रशियाकडून दररोज २६.६ लाख बॅरल तेलाची आयात

 

‘केपलर’ या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू जून महिन्यात १९ तारखेपर्यंत भारताने रशियाकडून सरासरी २६.६ लाख बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाची आयात केली आहे. मे महिन्यात हा आकडा १९.१ लाख बॅरल प्रतिदिन इतका होता. या मोठ्या वाढीसह रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनून राहिला आहे.

 

दुसरीकडे, भारताने जूनमध्ये UAE कडून ६.३६ लाख बीपीडी कच्च्या तेलाची आयात केली आहे, जी मे महिन्यातील ६.४४ लाख बीपीडी या विक्रमी पातळीच्या अगदी जवळ आहे. तर सौदी अरेबियाकडून झालेली आयात ३.८४ लाख बॅरल प्रतिदिन राहिली.

 

याशिवाय, व्हेनेझुएलाकडून होणाऱ्या आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. जूनमध्ये व्हेनेझुएलाकडून ३ ते ४ लाख बॅरल प्रतिदिन आयात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या २.०९ लाख बॅरल प्रतिदिन आयातीसह व्हेनेझुएला भारताचा चौथा सर्वात मोठा तेलपुरवठादार बनला आहे.

 

अमेरिकेकडून आयातीत मोठी घट

 

रशिया आणि यूएईकडील खरेदी वाढत असताना अमेरिकेकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट झाली आहे. जूनमध्ये अमेरिकेकडून भारताची आयात केवळ ९१ हजार बॅरल प्रतिदिन राहिली, तर मे महिन्यात हा आकडा २.५२ लाख बॅरल प्रतिदिन होता. यावरून भारताची ऊर्जा आयात धोरणे केवळ एका देशावर अवलंबून न राहता विविध स्रोतांवर आधारित असल्याचे स्पष्ट होते.

 

एलपीजी पुरवठ्यात अमेरिकेची भूमिका वाढली

 

ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एलपीजी (LPG) पुरवठ्यात अमेरिकेची वाढती भूमिका. खाडी देशांमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर अमेरिका भारतासाठी प्रमुख एलपीजी पुरवठादार म्हणून उदयास आली आहे. यामुळे पुरवठ्याचे विविधीकरण वाढले असले तरी, अमेरिकेपासूनचे अंतर जास्त असल्याने वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

होर्मुझ सामुद्रधुनीमुळे वाढली चिंता

 

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा आयातदार देश आहे. कच्चे तेल, एलएनजी आणि एलपीजीच्या गरजांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर खाडी देशांवर अवलंबून आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध आणल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या महत्त्वाच्या जलमार्गातून केली जाते. अमेरिका-इराण संघर्षविरामानंतर गेल्या आठवड्यापासून तेलवाहू जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी हा संघर्षविराम किती काळ टिकेल, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.