राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आणि प्रोत्साहनपर बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता राज्य सरकारकडून थेट एक लाख रुपयांपर्यंतचे पारितोषिक दिले जाते आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ योजनेअंतर्गत हा लाभ दिला जात असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला यामुळे मोठा आधार मिळतो आहे.
योजनेबद्दल माहिती
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. ११ जून २००३ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला होता. २००३ पासून राज्यभरात ही योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठी मदत ठरत असल्याचे सांगितले जाते.
लाभाचे स्वरुप काय?
या योजनेअंतर्गत विविध स्तरांवर गुणवत्तासिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाते. प्रत्येक बोर्डातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. विभागीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये दिले जातात. जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला २५ हजार रुपये, तालुक्यात प्रथम येणाऱ्याला १० हजार रुपये, तर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही प्रदान केले जाते.
योजनेमागचा उद्देश काय?
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. अनेक विद्यार्थ्यांना या योजनेमुळे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळत असल्याचे चित्र आहे.
अर्जप्रक्रिया कशी करावी?
दरम्यान, या योजनेसाठी अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपलब्ध करून दिले जातात. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.