पंढरपुरात ५ कोटींची घोषणा, फक्त २० मिनिटांत GR काढला, एकनाथ शिंदेंच्या ‘वर्क स्टाईलने’ वारकरी भारावले!

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या वेगवान शैलीचा प्रत्यय वारकऱ्यांना आला.

 

चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेतील पत्राशेड येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. विशेष म्हणजे, घोषणा केल्यानंतर ते पंढरपुरातून रवाना होण्यापूर्वीच, अवघ्या २० मिनिटांत या निधी वितरणाचा शासन आदेश अर्थात जीआर देखील जारी करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या गतिमान शैलीने वारकरी भारावून गेले.

चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेत कायमस्वरूपी उपाययोजना करा, शिंदेंचे निर्देश

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. दर्शन रांगेतील पत्राशेड आणि चंद्रभागा वाळवंट परिसरात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उत्तम व्यवस्था उभारण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली. चर्चा करतानाच त्यांनी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. निधी जाहीर होताच पुढील २० मिनिटांत त्याचे शासन परिपत्रक अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले.

 

दर्शनाच्या रांगेत भाविकांना पाणी वाटप आणि होडीतून नदीची पाहणी

 

 

या पाहणी दौऱ्याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूर नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी पत्राशेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेत उभे असलेल्या भाविकांशी थेट संवाद साधला आणि स्वतःच्या हस्ते त्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली.

 

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, शिंदेंकडून सूचना

आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, स्वतः होडीत बसून त्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. नदीपात्रात तैनात असलेल्या यंत्रणेकडे लाईफ जॅकेटबाबत विचारपूस करत, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तिथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सुरक्षेची साधने वापरत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.